३/७/१२



Sunday, January 01, 2006


मराठी साहित्यातील कुमार/किशोर वाङ्मयाचे स्थान

कुमार/किशोर वयोगट नक्की कुठे सुरु होतो आणि कुठे संपतो हे मला निश्चित माहीत नाही. मला अभिप्रेत आहे तो सुमारे ९ ते १४ वयोगटातील वाचकवर्ग. अक्षरओळख होऊन बराच वेळ झाला आहे, स्वतःहून पुस्तक वाचता येते हा आत्मविश्वास आलेला आहे परंतु अद्याप परिपक्व साहित्य वाचण्याची प्रगल्भता आलेली नाही असे काहीसे अडनिडे वय.

वाचनाची सवय माणसाला तशी आयुष्यात कधीही लागू शकते हे जरी खरे असले तरी बव्हंशी याच संवेदनक्षम वयात वाचनाची बीजे मनात रोवली जातात. या वयात लागलेल्या वाचनसवयींवरच मग तुमच्या भावी आवडी-निवडींचा (आणि एकप्रकारे भावी व्यक्तिमत्वाचा) डोलारा रचला जातो. केवळ वाचनच नव्हे तर संगीत, विचारांची जडण-घडण, शिष्टाचार अशा अनेक बाबतीत हे वय फार महत्त्वाचे असते.

तरूणवर्ग मराठी वाचन करत नाही असे सरसकट विधान करणे नक्कीच चुकीचे आहे. परंतु, त्याचबरोबर या वर्गाचा सहभाग हवा तितका नाही हेदेखील तितकेच खरे आहे. याचे एक कारण म्हणजे हातांच्या बोटांवर मोजण्या-इतपत साहित्यिक सोडले तर या वयोगटांतील मुलांसाठी लेखनाची वानवा. फास्टर फेणे या भा. रा. भागवतांच्या मानसपुत्राचा एक ठसठशीत अपवाद सोडला तर दिलीप प्रभावळकरांच्या बोक्या सातबंडे शिवाय अशा प्रकारच्या लेखनाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. विजया वाड यांचे काही कथासंग्रह, राजीव तांबे यांचे लेखन आणि विंदा करंदीकरांच्या काही कविता यादृष्टीने नक्कीच उल्लेखनीय असल्या तरी त्यांनी या समूहाच्या मानसावर हवी तशी पकड बसवलेली नाही. इंग्रजीतील हॅरी पॉटर सारखी प्रचंड लोकप्रिय पुस्तकमालिका पाहिली तर मराठीतील हा वाचकवर्ग केवढ्या मोठ्या आनंदाला मुकतो आहे याची कल्पना येईल.

असो, परंतु गेल्या काही वर्षांतील या क्षेत्रातील प्रगती उत्साहवर्धक आहे. कुमार साहित्यात अद्याप बराच प्रगतीला वाव असला तरी या वयातील मनोवस्थेचे प्रत्ययकारी चित्रण करणारी काही उत्तम पुस्तके यंदाच्या काही वर्षांत प्रकाशित झालेली आहेत. प्रकाश नारायण संतांची चारही पुस्तके - वनवास, झुंबर, पंखा आणि शारदा संगीत, लंपनच्या भावविश्वाचे सुरेख चित्रण करतात. दुर्दैवाने त्यांच्या अकाली निधनामुळे असे लेखन यापुढे वाचता येणार नाही या विचाराने हळहळायला होते. मिलिंद बोकीलांचे 'शाळा' हे पुस्तक तर नववी-दहावीत गेलेल्या प्रत्येकाने वाचावे असे आहे. या ना धड बालपण ना धड तारूण्य अशा त्रिशंकू वयात होणारी विविध भावावस्थांची आंदोलने (मूड्स) या पुस्तकात अचूक टिपलेली आहेत.

याच पुस्तकातील हा एक उतारा -

मला काय करावं ते सुचेना. मी जुळवून आणल्याप्रमाणं सगळं झालं होतं खरं. तिला चिठ्ठी मिळाली होती आणि त्याप्रमाणं ती इमानदारीत आलीसुद्धा होती. बहिणीला तिला कदाचित आणायला लागलं असणार. ती निघताना बहिणीनं हट्ट धरला असेल, कदाचित आईच घेऊन जा म्हणाली असेल, कदाचित तिनंच सोबत म्हणून आणलं असेल. पण आता बोलायचं कसं हा प्रश्न होता. ती आल्या आल्याच मी बोललो असतो तर गोष्ट वेगळी होती. आता जर जाऊन बोललो तर तिच्या बहिणीनं नक्कीच डाऊट खाल्ला असता. ती लहान असली तरी तिला तेवढं कळणारच.

मी काय करावं न कळून नुसता बसून राहिलो. आम्ही एकमेकांकडे मधून मधून बघत होतो आणि ती बहिणीशी बोलण्यात गुंग आहे असं दाखवत असली तरी तिचं लक्ष माझ्याकडे होतं हे मला माहीत होतं. पण वेळ फुकट जात होता. एवढं सगळं जमवून आणून काही बोलणंच नाही म्हणजे काय? परत अशी संधी कधी येणार? मला आतल्या आत खूप अस्वस्थ व्हायला होत होतं.

मग बराच वेळ असा गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते असं बसणंसुद्धा खूप छान होतं. त्या बाहेरच्या मंडपालाही स्वच्छ, गार काळी फरशी होती. फुलांचा आणि उदबत्त्यांचा सुंदर वास दरवळत होता. मधून मधून घंटा वाजत होत्या. सगळे लोक कसे स्वच्छ आंघोळी करून चांगले चांगले कपडे घालून आले होते. सगळं वातावरण कसं आनंदी आणि पवित्र होतं आणि मुख्य म्हणजे त्या मंडपात शिरोडकर होती. माझ्यापासून लांब बसलेली. पण तिच्या आणि माझ्यामध्ये काही तरी होतं. सोनेरी आकाशगंगेसारखं. आणि ते जे होतं त्यानं आम्हांला दोघांना बांधून घेतलं होतं. आणि ते इतर कुणालाच दिसत नव्हतं. तिच्या बहिणीला, आजूबाजूच्या माणसांना, कुणालाच नाही. फक्त आम्हांलाच दिसत होतं ते आणि तिथल्या त्या देवांना. ते आमच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत असणार आणि न मागताही आशीर्वाद देत असणार. आणि ते काही तरी होतं हे मला उशिरानं कळलं, पण शिरोडकरला आधीच कळलं असणार. म्हणून ती शांतपणे बसली होती. नुसती मंद मंद हसत.
मग मला कळलं की, आम्ही जे शोधतोय ते हे आहे. ते जे आमच्या दोघांमध्ये न बोलता भरून राहिलं होतं ते. आम्ही सगळेच ते शोधत होतो ते. मी, सुऱ्या, फावड्या, चित्र्या, आंबेकर, सुकडी, नरूमामा. आम्हांला सगळ्यांना पाहिजे होतं ते हेच. त्याला काय म्हणतात ते मला माहीत नव्हतं. पण त्याची काही गरज नव्हती. ते मला सापडलं होतं आणि तिलाही. मग पूर्वी कधीही पाहिला नव्हता असा आनंद माझ्या मनात भरून आला. मला खूप सुंदर वाटलं. पवित्र. भाग्यवान.

म्हणून मग थोड्या वेळानं त्या दोघी उठल्या आणि फाटकाकडे चालू लागल्या तेव्हा मी शांतपणे त्यांना जाऊ दिलं. ती फाटकातून जाताना मागे वळून पाहील हे मला माहीत होतं. तसं तिनं पाहिलंच. तिला लांबून दिसलं नसणार, पण मी समजूतदारपणे फक्त हसलो.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा